पाळीच्या वेळी होणा-या विविध तक्रारी
पाळीच्या वेळी होणा-या विविध तक्रारी
कुटुंब व्यवस्थेमध्ये स्त्री ही कुटुंबांच्या मध्यस्थानी असते. तिच्यावर कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक कामाच्या जबाबदा-या व ताण असतो. या सर्व व्यस्त दिनक्रमामध्ये तिला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही, वेळ मिळूनही ती स्वतःच्या आरोग्याला विशेष महत्त्व देत नाही. स्त्रियांच्या आरोग्याचा विचार करताना प्रत्येक महिन्याला नियमितपणे येणा-या मासिक पाळीचा विचार न करून कसे चालेल. ही तिला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे, ज्याद्वारे शरीरातील दोष प्रत्येक महिन्याला बाहेर टाकले जातात. खरंतर, पूर्वीच्या काळी स्त्री आरोग्याचा तक्रारी कमी होत्या. परंतु, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पाळीकडे होणा-या दूर्लक्षामुळे पाळीच्या तक्रारी वाढल्या व पर्यायाने स्त्री आरोग्याच्या तक्रारी वाढल्या.
वेगवेगळ्या आजाराचे निदान करण्यासाठी आलेल्या स्त्री रुग्णांना पाळी संबंधी काही त्रास आहे का विचारल्यास "नोर्मल आहे, काही त्रास नाही, थोडी मागे-पुढे होते, थोडे अंगावरुन कमी-जास्त जाते" असे सहज व दुर्लक्षित उत्तर मिळते. याविषयी जास्त खोलात जाऊन विचारल्यास असे लक्षात येते की, पाळी नॉर्मल आहे असे सांगणा-या या रूग्ण स्त्रियांना निरोगी पाळी विषयी फारसे माहीत नाही, असे लक्षात येते. पाळीच्या नेमकं तक्रारी काय आहेत याविषयी या लेखामध्ये जाणून घेऊया.
१) पोट दुखणे आणि कंबर दुखी:-
वयात आलेल्या मुलींमध्ये पाळी सुरू झाल्यावर हे लक्षण ब-याच वेळा आढळते. अशा मुलींमध्ये कमी जास्त प्रमाणाचा मलावरोध (constipation) असतो. यामुळे मोठ्या आतड्यात राहणारा व पोट साफ करण्यास मदत करणा-या वाताचा प्रकोप होतो. पोट व्यवस्थित साफ होत नसल्यामुळे, सतत प्रेशर केल्याने गुदा आणि कंबरेच्या भागावर ताण आल्यामुळे गर्भाशय व सभोवतालच्या अवयवांच्या स्नायुंमध्ये कोरडेपणा निर्माण होतो. प्राकृत स्थितीतील वायू योनिमुखातून संचित मासिक स्राव हळूहळू बाहेर फेकतो. या प्रक्रियेत बिघाड निर्माण झाल्याने वायू त्याचे कार्य चांगल्या प्रकारे करू शकत नाही. त्यामुळे पाळी सुरू होण्याच्या आधीपासून गर्भाशयगत वायूचा प्रकोप झाल्यामुळे कंबरेत, गर्भाशयात, ओटी पोटात वेदना, पाय दुखणे, अंग दुखणे, प्रसंगी उलट्या निर्माण होतात. स्रावाचा रंग काळपट असतो, स्राव कधी कमी कधी जास्त स्वरुपात होतो. अनेकदा वेदनायुक्त स्राव असतो.
विकृत झालेल्या वातामुळे वेदना होतात. त्यासाठी वात कमी करणा-या गोष्टींवर भर द्यावा. नियमित जेवण, आहारात कोरडे पदार्थ वर्ज्य करावे(ब्रेड, बिस्कीट, बेकरी पदार्थ इ.), जागरण करू नये, उपवास करू नये, आहारात स्निग्ध पदार्थ असावेत (जसे-दुध, तुप, फळाचे रस, ताजे तयार पदार्थ इ.). रोज सर्वांगाला औषधी तीळ तेलाची मालिश करावी (पाळीच्या काळात मालिश करू नये). पोट साफ होण्यासाठी योग्य ते औषध घ्यावे (उदाहरणार्थ,१०-१५ काळे मनुके पाण्यात भिजवून रात्री जेवणानंतर घेणे).
याबरोबरच स्त्रियांमध्ये पित्ताचा त्रास असल्यास पाळीच्या अगोदर घाम येणे, डोके दुखणे, चक्कर येणे, उलट्या होणे असे त्रासही होऊ शकतात. त्यामुळे आपली शरीर प्रकृती व पाळीच्या समस्या लक्षात घेऊन वेळीच ओषधोपचार करणे महत्त्वाचे ठरते.
२) अंगावरून पांढरे जाणे:-
कफवर्धक आहार (जसे की, गोड पदार्थ, थंड पदार्थ,फ्रिज मधील पदार्थ, शिळे पदार्थ, स्निग्ध पदार्थ, दही, जेवनानंतर फळे खाणे, दिवसा झोपणे, व्यायाम न करणे, दुध, तुप, चीज, पनीर यासारखे पदार्थ) घेण्याचे प्रमाण जास्त असणा-या स्त्रियांमध्ये पांढरे जाण्याचे प्रमाण अधिक असते.
तसेच प्रथम प्रसुतीनंतर योनिशैथिल्य आणि गर्भाशयावर आलेली सूज, जोडीला कफ निर्माण करणारा आहार असल्यास पांढरेपणा अधिक निर्माण होतो.
कित्येक स्त्रियांना पाळीच्या वेळी नुसता मासिक स्राव न जाता, मासिक स्राव व पांढरा स्राव एकत्रच होतो. काही स्त्रियांना पाळीपुर्वी ७-८ दिवस पांढरा स्राव होतो, काहींना पाळीनंतर, काहींना दोन पाळीच्या मध्ये देखील हा स्राव होतो. याचे स्वरुप चिकट, पांढरे, पिच्चिल, पाण्यासारखे पातळ असते. यासह खाज येणे, लघवीला त्रास होणे असे त्रासही होऊ शकतात. या सर्व तक्रारीत गर्भाशयाला आलेली सूज हे मुख्य कारण आढळते. त्याचबरोबर, सर्वायकल इरोजन (Cervical Erosion), लाली असणे अशा समस्या आढळतात. पाळीपूर्वी पातळ पाण्यासारखा पांढरा स्राव होतो, त्यामुळे पाळी सुरु झाली की काय अशी शंका येते. पाळीच्या ठिकाणी ओलसरपणा राहिल्यास खाज येऊ शकते.
स्थूलपणा वाढल्यामुळे गर्भाशय, पाळीच्या मार्गात शैथिल्य येते, शरीरात क्लेदाचे (ओलसरपणा) प्रमाण वाढून पांढरा स्राव सुरू होतो. अशा वेळी गर्भाशयाला बल देणारी शतावरी, केशर, बदाम, डिंक, खारीक या ओषदीचा वापर करावा लागतो. नियमित व्यायाम करणे, खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे, वैद्याच्या सल्ल्याने पोटातून औषध घेणे महत्त्वाचे असते.
३) स्पॉटिंग (Spotting):-
पाळी सुरू होण्यापूर्वी ४-५ दिवस आधी Spotting होते, म्हणजे थोडा-थोडा मासिक स्राव होतो. ही समस्या खूप स्त्रियांमध्ये आढळतो. याची कारणे व्यक्तिनुसार वेगवेगळी असतात. जसे की, सतत गर्भस्राव गर्भपात होणे, उशीराणे होणारे बांळतपण, वेळेवर व पुरेसा आहार न घेणे, दुचाकीवरुन खूप लांब प्रवास करणे आणि मानसिक ताणतणाव. त्यातील ही काही ठळक कारणे आहेत. कारणानुसार प्रत्येक गोष्टीचा विचार करून चिकित्सा केल्यास या तक्रारी कमी होऊ शकतात.
४) पाळीच्या वेळी रजस्राव अधिक होणे:-
पित्त प्रकृती, तिखट, आंबट, खारट जास्त प्रमाणात खाणे, रात्री जागरण करणे यामुळे उष्ण, तिक्ष्ण गुणाने पित्त वाढून मासिक स्राव अधिक प्रमाणात व अधिक लाल होतो. मासिक स्राव अधिक प्रमाणात म्हणजे ७ दिवसापेक्षा जास्त दिवस होणे किंवा पाळीच्या दिवसामध्ये प्रमाणापेक्षा जास्त अंगावरुन जाणे हा दोष मानावा. स्राव जास्त झाल्यावर स्त्रीला आपला रोजचा दिनक्रम पार पाडणे जड जाते. कंबरदुखी, पायाला पेटके येणे, दौर्बल्य, अशक्तपणा अशा प्रकारचे त्रास होतात.
काही वेळा मानसिक कारणांमुळे, आकस्मित घडणा-या घटनांमुळे मनाला धक्का बसल्यामुळे देखील मासिकस्राव अधिक होतो. यामध्ये मानसिक कारणांचा विचार करुन औषध योजना केल्यास उत्तम गुण येतो, असे लक्षात येते. यामध्ये प्रकृती नुसार आहार-विहाराची योजना करावी. विषेशतः खाण्यामध्ये तिखट, आंबट गोष्टी कमी सेवन कराव्यात, जागरण करू नये, मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा. आहारात दुध, तुप, मनुका, आवळा, डाळिंब, दुर्व्याचा रस अशा पित्त शामक गोष्टींचा समावेश करावा.
५) १५-१५ दिवसांनी पाळी येणे:-
वर सांगितल्याप्रमाणे पित्त प्रकृती किंवा पित्त वाढवणा-या गोष्टी खाण्यात असल्यामुळे पित्ताचा प्रकोप होऊन पाळी वेळेच्या अगोदरच पक्व होऊन शरीरच्या बाहेर पडते. ही समस्या विशेषतः तरुणपणा मध्ये जास्त जाणवते. सततच्या होणा-या त्रासामुळे स्त्रीची प्रकृती अतिशय खालावली जाते. मानसिक आणि शारीरिक दुर्बलता अतिशय वाढते. यात स्त्री अगदी क्षीण झाल्याप्रमाणे दिसते.
६) पाळीच्या वेळी मासिक स्राव कमी होणे:-
पाळी सुरू झाल्यापासून, साधारपणे १४ वर्षापासून मासिक स्राव हळूहळू होणे, ३-४ दिवसांपर्यंत होणे, ४-५ दिवशी स्राव बंद होणे ही स्वाभाविक स्थिती असते. क्वचित प्रसंगी, मासिक स्राव पहिल्या दिवशी कमी असतो व प्रमाणतः पुढे पुढे वाढत जातो व ४-५ दिवशी बंद होतो.
परंतु, पाळीच्या वेळी मासिक स्राव कमी होणे या तक्रारीत सुरुवातीला स्राव थोडा जाऊन नंतर पूर्णपणे बंद होणे, पाळीला सुरुवात झाल्यापासून प्रमाणतः कमी स्राव होणे, फक्त लघवीच्या वेळी थोडा थोडा स्राव होणे, ओटीपोटात वेदनासहित कमी स्राव होणे अशा समस्या दिसून येतात.
यामागचे कारण म्हणजे शरीरातील रस-रक्तादी धातु सकस नसल्यामुळे आणि पाळी बाहेर पडण्यासाठी मदत करणारा मोठ्या आतड्यातील वायुचा प्रकोप झाल्यामुळे मासिक स्राव शरीरातून कमी प्रमाणात बाहेर पडतो.
तसेच २-३ वेळा क्युरेटिंग (Curetting) झाले असल्यास किंवा गर्भस्राव व गर्भपात झाला असल्यास गर्भाशयाच्या अंतरावरणावर ताण येऊन मासिक स्राव कमी होण्याची प्रवृती निर्माण होते.
ही समस्या दूर करण्यासाठी शरीरावर असणा-या आजाराचा परिणाम नाहीसा करुन, पचनशक्ती सुधारून, रस- रक्तादी धातुंना बल देणारी औषधी व आहार सेवन करुन, पाळीचा स्राव व्यवस्थित करता येऊ शकतो.
७) पाळी उशिरा येणे:-
यामध्ये पाळी प्रत्येक महिन्याला न येता २-३ महिन्यांनी येते. स्त्रियांमध्ये लठ्ठपणा, आळशीपणा, दिवसा झोपण्याची सवय, खाण्यावर नियंत्रण नसल्याने, तीव्र अग्निमांद्य निर्माण झाल्याने वातकफदोषाची विकृती निर्माण होऊन पाळी उशिरा येते.
अशा स्त्रियांनी नियमित व्यायाम केल्यास, अग्निमांद्य दूर केल्यास, मेद कमी करणारा आहार विहार केल्यास उत्तम उपयोग होतो. लहान मुलीत ही समस्या सुरू झाल्यास बीजग्रंथीच्या ठिकाणी गाठी होऊन Polycystic Ovaries बनतात. म्हणून मुलींनी तरुण वयामध्ये नियमित आहारविहार व योग्य व्यायाम करणे आवश्यक आहे. अन्यथा PCOD (Polycystic Ovarian Disease) मुळे पाळी तर उशिरा येतेच व पुढील आयुष्यात आपत्यानिर्मितीवरही परिणाम होऊ शकतो.
पाळीसंबंधी वरील तक्रारी असल्यास, पाळीमध्ये काहीतरी बिघाड आहे हे लक्षात घ्यावे. डॉक्टरांच्या साहाय्याने योग्य ते निदान करुन औषधोपचार घ्यावे. त्यामुळे निरोगी व आनंदी आयुष्य जगण्यास मदत होईल. जेणेकरुन आपल्या कुटुंबाची, आनंदी व निरोगी आयुष्याची काळजी घेणे स्वस्थ स्त्रिला सहज शक्य होईल.
Comments
Post a Comment